ताज्या बातम्यारायगड
“अमूल्य कार्य, जिवंत स्मृती… प्रसन्नकुमार कामत यांच्या प्रथम पुण्यस्मरणात कुटुंबास विमा व मेडिक्लेम धनादेश”

रायगड : सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष व माजी सचिव म्हणून उल्लेखनीय कार्य केलेले प्रसन्नकुमार वासुदेव कामत यांच्या अपघाती निधनाला तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पतसंस्थेच्या संचालक अपघाती विमा योजनेअंतर्गत ₹5,00,000/- तसेच महाराष्ट्र राज्य वेल्फेअर असोसिएशनच्या सहकारी संस्थांसाठीच्या मेडिक्लेम योजनेअंतर्गत ₹48,000/- इतक्या रकमेचे धनादेश त्यांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आले.
पत्नी सुरेखा कामत, भाऊ संजय कामत, मुले विराज व प्रविण कामत यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष योगेश मगर, संचालक हरेश गायकर, सुनील तांबडकर, श्री. निळकंठ केमकर, व्यवस्थापक वैभव बोर्लीकर व गणेश मौर्य उपस्थित होते.
अध्यक्ष योगेश मगर यांनी कामत सरांच्या योगदानाची आठवण करून देत सांगितले, “सदस्यांच्या हितासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यांचे कार्य अमूल्य असून त्यांची स्मृती आमच्या हृदयात सदैव जिवंत राहील.”
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी दिवंगत कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.