ताज्या बातम्यारायगड
अंधारात बुडाले ‘टुरिस्ट टाऊन’ अलिबाग!
समुद्रकिनाऱ्यावरील स्ट्रिटलाईट बंद; भाजपकडून मनपावर संताप व्यक्त

अलिबाग : कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर गेल्या अनेक दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. स्ट्रिटलाईट बंद असल्यामुळे नागरिक, पर्यटक आणि वयोवृद्धांना रात्रीच्या वेळेस मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे पर्यटन शहराची प्रतिमा धुळीस मिळत आहे.
या गंभीर समस्येकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने अखेर भारतीय जनता पक्ष, अलिबागने आक्रमक भूमिका घेत थेट अलिबाग नगरपालिका गाठली. नगरपरिषदेला ठणकावणारे निवेदन सादर करत वीज विभागाच्या निष्क्रियतेचा समाचार घेतला.
भाजपच्या म्हणण्यानुसार, “संध्याकाळी समुद्रकिनारी चालायला येणारे नागरिक, पर्यटक, महिला, वयोवृद्ध यांना अंधारात जीव मुठीत घेऊन फिरावे लागत आहे. अपघात, चोरी यासारख्या घटना घडण्याचा धोका वाढला आहे. हे दुर्लक्ष असह्य असून तातडीने स्ट्रिटलाईट कार्यान्वित करण्यात याव्यात.”
निवेदन वीज विभागातील कुंडल यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी भाजपने स्पष्ट इशारा दिला आहे –
“जर लवकरात लवकर लाईट सुरु झाले नाहीत, तर भाजप जनतेला घेऊन रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन छेडेल.”
प्रशासन झोपले आहे का?
ज्या अलिबागला कोट्यवधींचे पर्यटन उत्पन्न मिळते, तिथे मूलभूत सुविधा देखील बंद ठेवल्या जात आहेत. नगरपालिका आणि वीज विभाग यांची निष्क्रियता आता नागरी सहनशीलतेच्या सीमेलाही ओलांडत आहे. हा अंधार प्रशासनाच्या उदासीनतेचा आरसा आहे.
रोशन भगत तालुका मध्य अध्यक्ष, अशोक वारगे दक्षिण तालुका अध्यक्ष, स्वप्निल गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
….