ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
अंधाराच्या सावलीतला खून : येरद गावातील रहस्यमय गुन्हा
गुन्ह्याचा शेवट झाला, पण त्या रात्रीचा दरवाज्यावरचा ठोका आजही गावकऱ्यांच्या मनात घुमतो आहे…

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग | प्रतिनिधी
येरद… माणगाव तालुक्यातील एक शांत, गावठी वाडी.
10 मे 2025 ची रात्र. घड्याळ्याची काटा 10.36 वर थांबलेला. त्या क्षणी गावातील एका घराचा दरवाजा ठोठावला गेला.
घरात एकटीच असलेल्या 70 वर्षीय संगिता मनोहर मोकाशी यांनी दार उघडलं. समोर उभा होता गावातीलच एक तरुण – तहान भागवायला पाणी मागत होता. त्याच्या डोळ्यात मात्र तहान काही वेगळीच होती…

क्षणभरात सगळं बदललं.
शांत घरात गुदमरणाऱ्या किंकाळ्या घुमल्या, हातातून दागिने हिसकावले गेले आणि श्वास एका अज्ञात हाताने थांबवले गेले. काही क्षणांत प्रकाश हरपला… आणि अंधारात फक्त मृतदेह व दोन मोबाईल नसलेला घराचा कोपरा शिल्लक राहिला.
गूढाच्या शोधात पोलीस
गावभर भीतीचं सावट. “हा कोण होता?” हा प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यात. पोलिसांनी घटनास्थळावरून सुरुवात केली. पावलांचे ठसे, उलटसुलट झालेल्या वस्तू, शेजाऱ्यांच्या साशंक नजरा… सगळं काही तपासलं.
पण सत्य मात्र हाताच्या बोटांतून वाळूसारखं निसटत होतं.
दरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीदारांच्या कुजबुजीतून एक नाव पुढे आलं – कल्पेश बबन जाधव (वय 22, येरद आदिवासीवाडी).
तोच का खूनखराबा करणारा? की कोणाच्यातरी सांगण्यावरून सापळ्यात अडकलेला? गावात कुजबुज सुरू झाली.

रहस्याचा उलगडा
29 ऑगस्टच्या रात्री 9.31 वाजता पोलिसांनी शिताफीने त्याला पकडलं.
गुन्ह्याची कबुली, दागिन्यांचा लोभ आणि “पाण्याचा बहाणा”… सत्य उघड झालं.
30 ऑगस्ट रोजी न्यायालयीन कोठडी मिळाली. तरीही गावाच्या मनात अजून प्रश्न घोंगावतोय –
इतक्या निर्दयीपणे एखादा तरुण आपल्या गावातल्या वृद्धेचा खून करू शकतो?
त्यामागे अजून कोण आहेत का?
सावल्यांमधील धागे
गुन्हा उलगडला असला, तरी त्या रात्रीच्या अंधाराची सावली अजूनही येरद गावावर दाटून आहे.
दारावर ठोठावणारा हात आजही गावकऱ्यांच्या स्वप्नात घुमतो…




