ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीत २ हजारांची भाऊबीज भेट

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्या सणासुदीचा आनंद वाढवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने दिवाळी निमित्त भाऊबीज भेट जाहीर केली आहे. या अंतर्गत सर्व सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी २ हजार रुपये देण्यास शासनाने मान्यता दिली असून यासाठी तब्बल ४०.६१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निर्णयासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) देखील जारी करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मंत्री तटकरे म्हणाल्या, “अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपन, पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोषण, शिक्षण आणि आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या या सेवेला दाद म्हणून आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात आनंदाचा क्षण निर्माण व्हावा या उद्देशाने शासनाने भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, राज्यातील प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी ‘शक्ती’ आहे. महिलांचे सशक्तीकरण आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारी ही आर्थिक भेट त्यांच्या दिवाळीला उजाळा देणारी ठरेल.

या अनुषंगाने आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्या माध्यमातून ही भाऊबीज भेट रक्कम थेट सेविका आणि मदतनीस यांना वितरित करण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलेल, आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीही हा सण अधिक आनंदाचा ठरेल.


Related Articles

Back to top button